नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील निर्णायक निकाल येण्याची शक्यता असून याआधीच १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत दोन्ही गटांनी आपापली प्रतिज्ञापत्रे कोर्टाला सादर केली आहेत.
राज्यातील सत्ता पलटाच्या पहिल्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांना अपात्र करण्यात यावे यासाठी शिवसेनेने कोर्टात धाव घेतली असून यावर आज सुनावणी आहे. या अनुषंगाने कोर्टाने दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने शिवसेनेने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यात म्हटले आहे की, शिंदे गटाने पक्षाविरोधात गैरकृत्य केले आहे. आपले कृत्य योग्य असल्याचे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसवर आरोप केला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे आपले मतदार नाराज असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण, सत्य हे आहे की, हीच लोक अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री राहिले आहे. त्यावेळी त्यांना कोणतीच अडचण नव्हती. शिंदे गट ज्या भाजपला आपला जुना मित्रपक्ष मानत आहे. त्याच भाजपने शिवसेनेला कधीच बरोबरीचा दर्जा दिला नाही.
यात पुढे म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. ज्यावेळी सरकार स्थापन झाले होते, त्यावेळी या आमदारांनी सर्व सोई आणि सुविधांचा फायदा घेतला. त्यावेळी त्यांनी कधी मतदार आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगितले नाही. जर ही लोक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यामुळे इतकेच त्रस्त होते तर कॅबिनेटमध्ये सहभागी झाले नसते, अशी भूमिकाही शिवसेनेनं या प्रतिज्ञापत्रात मांडली आहे.
तर शिंदे गटाने १६ आमदारांना अपात्र करण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. आमच्यासोबत शिवसेनेचे बहुतांश आमदार आल्यामुळे ही कारवाई करता येणार नसल्याचा युक्तीवाद यात करण्यात आला आहे.