अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर येथे अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण शिबीर संपन्न झाले.
शिबिराची औपचारिक सुरुवात शाळेचे संचालक पराग पाटील, देवेश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांच्या नावाची संगणकावर नोंदणी करून करण्यात आली. सदर शिबिरासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या माध्यमातून चांगला प्रतिसाद दिला व आपले लसीकरण करून घेतले. विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्यानंतर घ्यावयाची वैद्यकीय स्वरूपाची काळजी याची अतिशय उत्तम व सक्षम स्वरूपाची तयारी शाळेकडून करण्यात आली.
या शिबिरासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी वंदना पाटील, शीतल बोरसे, सगुणा बारेला, प्रतिभा सावळे यांचे सहकार्य लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती काढून त्यांना लसीकरणाचे फायदे सांगितले. शिबिरास संस्थेच्या अध्यक्षा अॅड.ललिता पाटिल, प्राचार्य विकास चौधरी, समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी यांची उपस्थित होते.