Home क्राईम बेदम मारहाणीत प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू; सासऱ्यासह शालकावर गुन्हा दाखल

बेदम मारहाणीत प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू; सासऱ्यासह शालकावर गुन्हा दाखल

0
155

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कौटुंबिक वादातून झालेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या योगेश प्रल्हाद पाटील (वय ४४, रा. नांद्रा, ता. जामनेर) या तरुणाचा उपचारादरम्यान २७ सप्टेंबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मयत योगेशचे सासरे आणि शालक अशा दोन जणांवर सोमवारी, २९ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना?
जामनेर तालुक्यातील नांद्रा येथे योगेश प्रल्हाद पाटील हा आपल्या पत्नी आणि मुलांसह वास्तव्यास होता. योगेश आणि त्यांची पत्नी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते आणि हे प्रकरण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मागील महिला दक्षता विभागात गेले होते.

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवर मारहाण:
१२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास योगेश पाटील हे पत्नीसोबत सुरू असलेला वाद मिटवून तिला घरी घेऊन जाण्यासाठी तयार झाले होते. याच दरम्यान, पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या समोरील मुख्य गेटजवळ योगेश पाटील यांना त्यांचे सासरे निवृत्ती तुकाराम पाटील आणि शालक चेतन निवृत्ती पाटील (दोघे रा. सवतखेडा, ता. जामनेर) यांनी गाठले. या दोघांनी योगेशला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत योगेश गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जळगावातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच १५ दिवसांनी, म्हणजे २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

सासरे आणि मेहुण्यावर गुन्हा दाखल:
या दुर्दैवी घटनेसंदर्भात मयत योगेश पाटील यांचे चुलत भाऊ श्रीराम पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वैद्यकीय अहवाल आणि नातेवाईकांनी केलेल्या आरोपावरून पोलिसांनी संशयित आरोपी निवृत्ती तुकाराम पाटील आणि चेतन निवृत्ती पाटील या दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जामनेर आणि जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound