सांगली (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील ब्रम्हऩाळ गावात पुराचे पाणी घुसले असतांना स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यात बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. याच पुरग्रस्त गावाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हे गाव दत्तक घेतले आहे.
पुरग्रस्त ब्रह्मनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. ब्रह्मनाळ गावात बोट अपघातात काही नागरिकांचे निधन झाले होते. या संकट काळात ब्रम्हनाळ गाव प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतल्याचे कळताच गावचे सरपंच व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ग्रामपंचायतीने पत्र देऊन आंबेडकर यांचे आभार मानले असून आपले प्रतिनिधी सचिन माळी आणि डॉ. अनिल गुरव यांनी आमच्या गावात पाहणी केल्याचेही या पत्रात म्हटले आहे. तसेच, आमचे गाव पुनर्वसनासाठी आपणास दत्तक देत असल्याचेही सरपंचांनी लिहिलेल्या या पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच गाव दत्तक घेतल्यानंतर नेमके काय करण्यात येईल, याबाबतही सरपंच यांनी माहिती दिली आहे.