अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर परिसरात 19 मार्च रोजी होणाऱ्या ‘भूमी सुपोषण चळवळी’च्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक प्रशासकीय बैठक पार पडली.
अक्षय कृषी परिवार आणि मंगळग्रह सेवा संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमासाठी शुक्रवार, 13 मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथे सुमारे दोन तासांची प्रशासकीय मेगा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, पोलीस उपअधीक्षक विनायक कोते, जिल्हा कृषी अधीक्षक के. एन. तडवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, बीडीओ एन. आर. पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय कृषी विभागाचे उपसंचालक भरत इंगळे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता टी. एच. नेमाडे, उपकार्यकारी अभियंता नितीन चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, निवासी नायब तहसीलदार सी. यू. पाटील आणि नायब तहसीलदार ए. पी. कुलकर्णी यांच्यासह शासकीय यंत्रणेतील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मंदिराच्या अभिषेक गृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेसह या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून त्यांना आवश्यक सूचना दिल्या. या वेळी कृषी अधिकाऱ्यांनी भूमी सुपोषण चळवळीच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली. या चळवळीचे महत्त्व अधोरेखित करताना जिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितले की, देशातील कृषी क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असलेली ही चळवळ प्रत्यक्षात लोकचळवळ आहे. मात्र, याला शासकीय पाठबळ मिळाल्यास ती अधिक व्यापक आणि प्रभावी ठरू शकते.
कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध विभागांना विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. अमळनेरकडे येणारे आणि शहरातून बाहेर पडणारे सर्व रस्ते तपासून रस्त्यांवरील समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच सती माता मंदिराजवळील बोगदा आणि रस्त्याशी संबंधित प्रश्नही युद्धपातळीवर सोडवण्यास सांगितले. कार्यक्रमादरम्यान अग्निशामक दल, ॲम्बुलन्स सेवा आणि पुरेसे पोलीस बंदोबस्त उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीदरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी कृषी क्षेत्रातील सर्व घटकांपर्यंत जाऊन या उपक्रमाची माहिती पोहोचवणे आवश्यक असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना भूमी सुपोषणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी कार्यक्रमाचे स्वरूप आणि उपक्रमाचे महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट केले. 19 मार्च रोजी होणारा हा कार्यक्रम देशातील सर्व कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये तसेच देशातील सुमारे 600 जिल्ह्यांमध्ये थेट प्रक्षेपित केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या थेट प्रक्षेपणासाठी आवश्यक तांत्रिक तयारी जवळपास पूर्ण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळ, पार्किंग व्यवस्था, व्हीआयपी पार्किंग, आगमन व निर्गमन मार्ग, स्वच्छतागृहे आणि इतर सुविधा यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता पवार-नेरकर यांनीही मंदिर आणि कार्यक्रम स्थळाला भेट देत सुरक्षा व्यवस्थेबाबत आवश्यक सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रोहन घुगे यांनी प्रथमच श्री मंगळग्रह मंदिराला भेट दिली. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी त्यांना मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व समजावून सांगितले. यानंतर मंदिरात जिल्हाधिकारी घुगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी विधिवत पूजा केली. मंदिरातर्फे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम आणि मंगल सेवेकरी प्रकाश मेखा यांनी त्यांचा सत्कार केला.
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर हे जागतिक स्तरावर विशेष महत्त्व असलेले धार्मिक स्थळ मानले जाते. येथे दाक्षिणात्य शैलीतील भूमी मातेसमोरील एकमेव मूर्ती तसेच विश्वातील एकमेव भूमीपुत्र म्हणजेच श्री मंगळग्रहाची स्वयंभू मूर्ती असल्याने या मंगल नगरीचे धार्मिक महत्त्व अधोरेखित होते. त्यामुळेच भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभासाठी अमळनेरची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, 19 मार्च हा दिवस वर्षप्रतिपदा असल्याने त्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. वर्षप्रतिपदा हा भूमी मातेचा जन्मदिवस मानला जातो आणि याच दिवशी हिंदू नववर्षाचा प्रारंभ तसेच गुढीपाडव्याचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असतो. त्यामुळे या दिवशीच भूमी सुपोषण चळवळीचा राष्ट्रीय शुभारंभ करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.



