Home प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय भुसावळ शहरात भेडसविणाऱ्या समस्यांकडून प्रशासनाकडून दुर्लक्ष ; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !

भुसावळ शहरात भेडसविणाऱ्या समस्यांकडून प्रशासनाकडून दुर्लक्ष ; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील तीन अत्यंत गंभीर आणि जनहिताच्या मुद्द्यांवर स्थानिक नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींमध्ये मतदान यादीतील बोगस व मयत मतदारांची नावे, १५ वर्षांपासून प्रलंबित नागरी सुविधांचा अभाव, तसेच धोकादायक शाळा इमारतीचा प्रश्न अशा महत्त्वाच्या समस्यांचा समावेश आहे. प्रशासकीय दुर्लक्षाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

बोगस मतदारांबाबत निवडणूक अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह:
भुसावळ शहरातील पटेल कॉलनी येथील रहिवासी इल्यास इक्बाल मेमन यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “२०१६ पासून प्रभाग क्र. १४ (आताचा १५) मधील सुमारे १२५० बोगस, मयत, स्थलांतरित व ग्रामीण भागातील मतदारांची नावे वगळण्याची मागणी लेखी पुराव्यांसह वारंवार केली, मात्र अजूनही कोणतीही कारवाई झाली नाही.” निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत त्यांनी स्थानिक अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मेमन यांनी अपात्र मतदारांची नावे तात्काळ वगळणे, २०१६ पासूनच्या सर्व अर्जांची चौकशी व लेखी उत्तर देणे, संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करणे आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी कारवाईचा अहवाल प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.

१५ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित नागरिक:
मेहमूद अली रोड, खडका चौफुली परिसरातील हजारो नागरिकांनी नियमित घरपट्टी भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पिण्याचे पाणी, लाईट, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा व शिक्षण व्यवस्था यांसारख्या मूलभूत सेवा मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गळतीची पाईपलाईन, अपुरा पाणीपुरवठा, अंधारमय रस्ते, बंद स्ट्रीटलाईट, उखडलेले रस्ते, तुंबलेले नाले व सांडपाण्याचा रस्त्यावर प्रवाह, अपूर्ण फवारणी, उघडी मुतारी, ओपन स्पेसचा अपवापर, आरोग्य व शिक्षण सेवा पूर्णतः कोलमडलेली अशा अनेक समस्यांचा त्यांनी निवेदनात उल्लेख केला आहे. जिल्हाधिकारीमार्फत सर्वेक्षण व विशेष अहवाल तयार करावा, १५ वर्षांच्या कामांचे व खर्चाचे ऑडिट व्हावे, दोषी अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कारवाई करावी आणि सार्वजनिक जनसुनावणी घेऊन प्रभागनिहाय कृती आराखडा तयार करावा, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

धोकादायक शाळा इमारतीचा गंभीर प्रश्न:
मोहम्मद अली रोडवरील उर्दू शाळा क्र. ३, २०, २१, २२ या सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या शाळा सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. स्लॅब गळणे, पाणी गळती, उघडी वीज वायरिंग, प्लास्टर उखडलेले असे अनेक गंभीर धोके असतानाही शाळा सुरू असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. धोकादायक इमारत तात्काळ जमीनदोस्त करून नवीन इमारतीचे काम सुरू करावे, तात्पुरत्या वर्ग खोल्यांसाठी निधी व जागा उपलब्ध करून शिक्षण सुरळीत करावे, मुख्याधिकारी यांच्यावर चौकशी व विलंबाची जबाबदारी निश्चित करावी, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, शिक्षण साहित्य यांची व्यवस्था तातडीने व्हावी, अशा मागण्या पालकांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारींनी स्वतः पाहणी करावी, अन्यथा संभाव्य अपघातास प्रशासन जबाबदार राहील, अशी चेतावणीही देण्यात आली आहे.

कब्रस्तानच्या प्रलंबित कामांबाबतही रोष:
यासोबतच, मुस्लिम कब्रस्तानसाठी २०१९, २०२२ आणि २०२४ साली नगरपरिषद बैठकीत मंजूर झालेल्या विविध कामांसाठी (वीज, पाणी, थंड पाण्याची मशीन, संरक्षक भिंत, रस्ता, नाली, पत्र्याचे शेड, बेंच, स्ट्रीट लाइट व कंपाउंड वॉल) आजपर्यंत कोणतेही काम नगर पालिका प्रशासनाने केले नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound