जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात अयोध्या-प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या व सुरक्षित असलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर मदत कार्य सुरू केले आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने विशेष रेल्वे आरक्षण बोगीद्वारे भाविकांच्या सुरक्षित परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली आहे.
या बचावकार्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासन, सुलतानपूर जिल्हा प्रशासन, लखनऊ रेल्वे विभाग, भुसावळ मध्य रेल्वे विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी तत्काळ समन्वय साधला. जखमी व सुरक्षित असलेल्या सर्व भाविकांसाठी एक दिवसाची निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर त्यांना रेल्वेच्या आरक्षित बोगीपर्यंत सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारीही प्रशासनाने पार पाडली. निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ हे सर्व विभागांशी समन्वय साधून मदत कार्य करीत आहेत.

एका भाविकाचा मृत्यू; मृतदेह सुपूर्द या दुर्दैवी अपघातात पिंप्राळा, जळगाव येथील छोटीबाई शरद पाटील (वय ५५) यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृतदेहासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. आज दुपारी त्यांचा मृतदेह पिंप्राळा येथे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
उपचारानंतर सर्व भाविक सुखरूप अपघातात जखमी झालेल्या भाविकांवर सुलतानपूर येथील शासकीय रुग्णालयात तात्काळ आणि आवश्यक उपचार करण्यात आले. आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळाल्यानंतर आता सर्व भाविक सुखरूप असून, परतीच्या प्रवासाला लागले आहेत. हे भाविक उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत रेल्वेने जळगाव आणि भुसावळ रेल्वे स्टेशन येथे पोहोचतील. तहसीलदार (धरणगाव) महेंद्र सूर्यवंशी हे भाविकांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी समन्वय साधत आहेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाला जखमी भाविकांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या, त्यानुसार प्रशासनाने जलद प्रतिसाद दिला आहे



