जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेच्या पुढील टप्प्यात ते जळगाव जिल्ह्यात येणार आहेत. क्रांती दिन अर्थात ९ ऑगस्ट रोजी तीन तालुक्यांमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत.
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. पक्षाचे चार तर समर्थक एक अशा पाच आमदारांनी शिंदे गटाची साथ घेतली आहे. यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळल्याचे आजचे चित्र आहे. मात्र एकीकडे आमदारांनी शिंदे गटाकडे धाव घेतली असली तरी बहुतांश पदाधिकारी अद्यापही उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे आज तरी दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी मातोश्रीवर भेट दिली असता उध्दव ठाकरे यांनी आक्रमक भाषण करून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची ग्वाही दिली होती. या पाठोपाठ आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्हा दौर्यावर येत आहेत.
आदित्य ठाकरे हे मंगळवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहेत. यात जळगाव विमानतळावरून ते पाचोरा येथे जाणार असून साडे अकरा वाजता ते स्थानिक पदाधिकार्यांशी संवाद साधतील. यानंतर दुपारी पावणेदोन वाजता ते धरणगावात सभा घेणार आहेत. तर तीन वाजता पारोळा येथे सभा घेतल्यानंतर ते धुळे, मालेगावमार्गे नाशिकला जाणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौर्याचे शिवसेना व युवासेनेतर्फे नियोजन करण्यात येत आहे.