राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे-निलेश राणे आमने-सामने; कार्यकर्त्यांमध्ये राडा

सिंधदुर्ग-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सिंधुदुर्गमधील मालवण समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट किल्ला परिसरात नौदलाने उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा केवळ ८ महिन्यातच कोसळल्यानंतर राज्यातील शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून राजकारणही तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला पुतळा कोसळल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्योरापांच्या फैरी सुरू आहेत. या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने मालवणमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होते. मोर्चा राजकोट परिसरात पोहोचताच ठाकरे व राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही गटातील महिलाही आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या.

राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी आदित्य ठाकरे आले होते. तर त्याचवेळी निलेश राणेहीआले होते. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दोन्ही पक्षातील समर्थकांमध्ये बाचाबाची व नंतर तुफान हाणामारी झाली. महिला कार्यकर्त्याही एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या. निलेश राणे व आदित्य ठाकरे आमने-सामने आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. राणे समर्थकांनी आक्रमक होत, आदित्य ठाकरेंना मालवणच्या बाहेर जाऊ देणार नसल्याची धमकी दिली. यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली की, त्यांचा गैरसमज आहे. त्यांना वाटतं आम्ही कोंबडे वगैरे सोबत आणलेत,पण आम्ही चोर वाटेने जाणार नाही.

राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी निलेश राणे, नारायण राणे, आदित्य ठाकरे आणि जयंत पाटील एकाच वेळी आल्यानं महायुती व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आल्याने पोलिसांनी दोरी टाकून राणेंना अडवण्यात आलं. यामुळे नारायण राणेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आम्ही स्थानिक आहोत,आम्हाला का लावलंय. असं म्हणत दोरी काढण्यासाठी निलेश राणे आक्रमक झाले. हा राडा पाहून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तेथून वाट काढून निघून गेले मात्र आदित्य ठाकरेंनी तेथेच ठिय्या मांडला.

त्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. याचे पर्यावसान जोरदार हाणामारीत झाले. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना उतरावं लागलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना थांबण्याचं आवाहन केलं. येथे राणेंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. दरम्यान या घटनेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, येथे वाद निर्माण करण्याची गरज नाही. दुर्घटना घडल्याने येथे वेगवेगळ्या पक्षाचे नेते येत आहेत. त्यांच्याशी स्थानिक नेत्यांनी वाद घालणं योग्य नाही, अशी टीका राणेंवर केली. भ्रष्टाचार, नाकर्तेपणा हे सगळं उघड झालंय, त्यामुळे सरकारची बाजू चिडलेली दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Protected Content