चोपडा (प्रतिनिधी) येथील विवेकानंद विद्यालयाची माजी विद्यार्थिनी व विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अनिल गंगाधर शिंपी यांची कन्या अदिती ही अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे एप्रिल २०१८ या सत्रात घेण्यात आलेल्या तबलावादन विशारद पूर्ण परीक्षेत महाराष्ट्रात सर्वाधिक गुण मिळवून मंडळाचे नऊ पुरस्कार प्राप्त करत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
तिला हा पुरस्कार मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक सुरेश तळवलकर, गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रभाकर भांडारे व विकास कशाळकर यांच्या हस्ते देण्यात आला. खान्देशला संगीत क्षेत्रातला हा खूप मोठा सन्मान अदितीने मिळवून दिला आहे, त्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. अदितीला चोपड्याचे संगीत शिक्षक वसंत मयूर यांच्याकडून तबलावादनाचे प्रशिक्षण मिळत आहे. याप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्यासोबतच संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या समवेत सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी व पालक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.