यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डोंगर कठोरा येथील अ. ध. चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला असून गांधी विचार संस्कार या राज्यस्तरीय परीक्षेत आढाळे या दोन्ही बहिणींनी जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात विद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले आहे.
गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता २०२५-२६ अंतर्गत आयोजित “गांधी विचार संस्कार परीक्षा-२०२५” ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण जिल्ह्यातील शाळांमध्ये घेण्यात आली होती. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा १ मध्ये पुरस्कार प्राप्त केलेल्या डोंगर कठोरा येथील अ. ध. चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्येही या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते, हे विशेष उल्लेखनीय आहे.

या परीक्षेत इयत्ता ११ वीतील विद्यार्थिनी पूनम बाळू आढाळे हिने मोठ्या गटातून तर इयत्ता ६ वीतील विद्यार्थिनी आम्रपाली बाळू आढाळे हिने लहान गटातून जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला. एकाच कुटुंबातील दोन्ही बहिणींनी मिळवलेले हे यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सदर परीक्षेत विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या एकूण १०९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. नुकताच जाहीर झालेल्या निकालात पूनम आढाळे हिला ११ वी व १२ वीच्या गटात जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल सिल्वर मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे ५ वी ते ७ वीच्या गटात आम्रपाली आढाळे हिला देखील जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल सिल्वर मेडल प्रदान करण्यात आले, तर रसिका प्रवीण पाटील हिला जिल्ह्यात तृतीय क्रमांकासाठी ब्रॉन्झ मेडल देण्यात आले.
आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६, बुधवार रोजी विद्यालयात आयोजित गुणगौरव सोहळ्यात मुख्याध्यापक नितीन झांबरे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थिनींना मेडल व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रा. एन. व्ही. वळींकार, प्रा. रामेश्वर जानकर, प्रा. नयना पाटील, उपशिक्षक आर. पी. चिमणकारे, पी. पी. कुयटे, विवेक कुलट, मनीषा तडवी, शुभांगीनी नारखेडे, सोनाली फेगडे, चेतन चौधरी, सचिन भंगाळे, क्लार्क ठकसेन राणे, ग्रंथपाल योगेश राणे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गांधी विचार आणि संस्कारांची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या परीक्षेत मिळालेले यश हे विद्यालयातील शैक्षणिक वातावरण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचे फलित असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



