जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तरुणांमध्ये तंबाखू आणि दारूच्या व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून त्याचे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक परिणाम गंभीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मानसिक आधार याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बेंगलोर येथील निम्हान्स इन्स्टिट्यूटमधील सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. धरव शहा हे आज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

केतकी सभागृहामध्ये शुक्रवारी दि. १२ रोजी दुपारी अडीच वाजता होणाऱ्या या व्याख्यानासाठी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे. तंबाखू आणि दारूच्या सेवनामुळे निर्माण होणारी व्यसनाधीनता, मानसिक ताण, व्यक्तिमत्वातील बदल, शिक्षणातील घसरण, कुटुंबीयांशी ताणतणाव यांसारख्या विषयांवर डॉ. शहा विद्यार्थी वर्गाशी संवाद साधतील. तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी मार्गदर्शन आणि सल्ला मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे महाविद्यालयातून सांगण्यात आले आहे.

या सत्रात महाविद्यालयातील मानसोपचार विभागातील तज्ज्ञही सहभागी होणार आहेत. डॉ. मयूर मुठे, डॉ. उमेद महाडिक, डॉ. हिमेश जाधव, डॉ. रुचिता आटे, डॉ. उमा चांदूरकर आणि डॉ. देवांश कडत्रा हेही विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीबाबत तसेच मानसिक आरोग्यावर उपयुक्त मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांनी वेळेवर सभागृहात उपस्थित राहून या ज्ञानमूल्यपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.



