चोपडा प्रतिनिधी । शहरातील दाणाबाजार परिसरात हमाल व जनरल कामगार संघटना आणि जनमानवता बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने जीवन ज्योती व्यसनमुक्ती केंद्रातर्फे नुकतेच हमाल कष्टकरी बांधवांसाठी व्यसनमुक्ती समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले असून व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ.बाळासाहेब कुमावत यांनी व्यसनाचे दुष्परिणाम सांगून व्यसनमुक्ती कार्याबद्दल माहिती दिली. ‘व्यसनाला करूया लांब परिवाराला देऊया साथ’ यावर प्रितम कुमावत यांनी विवेचन देत व्यसनाला पर्याय वेसनील प्लस आयुर्वेदिक पावडर याविषयी माहिती दिली. तंबाखूजन्य कॅन्सरला आमंत्रण देवू नका याविषयी जनमानवता बहुउद्देशीय संस्थेचे राज मोहम्मद खान यांनी माहिती सांगून व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गोसावी यांनी मतदान जनजागृती कार्याबद्दल देखील माहिती देत कुठलेही अभिलाषा भीतीला थारा न देता मतदानाच्या पवित्र कार्यात निर्मळ सहभाग घेण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे दाणाबाजार माथाडी हमाल व जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष शेषराव वायकर यांनी जीवन ज्योती व्यसनमुक्ती केंद्राचे कौतुक करत आभार प्रदर्शन केले.