भुसावळ प्रतिनिधी । तालुका वकील संघाचे सदस्य ॲड. कडू इंगळे यांच्यावर काही अज्ञात लोकांनी प्राणघात हल्ला केल्याप्रकरणी भुसावळ तालुका वकील संघातर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला असून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी, यासाठी वरणगाव पोलिस स्टेशनला पत्र देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ॲड. कडू इंगळे हे दुचाकीने वरणगाव येथील नागेश्वर मंदिराजवळ बोदवड येथे त्यांच्या घरी जात होते. मात्र त्यांना काही अज्ञात लोकांनी अडवून घेत इंगळे यांच्यावर चाकू आणि काठीने प्राणघातक हल्ला केला आहे. तसेच इंगळे यांच्या खिशातून पाच हजार रुपये काढून घेतले. इंगळे यांनी आरडा-ओरड करायाला सुरुवात केल्यानंतर सर्व आरोपी पळून गेले. या घटनेचा भुसावळ वकील संघाने जाहिर निषेध करत घटनेतील आरोपींचा तात्काळ शोध घेत आरोपींना अटक करण्यात यावी, यासाठी वकील संघाने वरणगाव पोलीस स्टेशन यांना सुध्दा पत्र देण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधवेळी सर्व तालुका वकील संघाचे वकील उपस्थितीत होते.