अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) मध्ये निवड झालेल्या जवान प्रशांत सुनील पाटील यांचे गावी प्रथम आगमन झाल्यानंतर नागरिकांनी उत्स्फूर्त आणि जल्लोषात स्वागत केले. प्रशांत पाटील यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सर्व भरती प्रक्रियेतील कसोट्या यशस्वीरीत्या पार करत अव्वल स्थान मिळविले आहे. अकरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून ते गावी परतल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
१२ रोजी सकाळी ११ वाजता प्रशांत पाटील यांचे अडावद येथे आगमन झाले. यावेळी दत्त मंदिरापासून वाजतगाजत मिरवणूक काढून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. गावातील रस्ते आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आले होते, तसेच फुलांच्या पाकळ्यांची उधळण करून वातावरण उत्साहपूर्ण करण्यात आले.

प्रशांत पाटील हे भारतीय पत्रकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलास पाटील यांचे पुतणे असून प्रगतशील शेतकरी सुनील पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या यशामुळे कुटुंबियांसह संपूर्ण गावाचा अभिमान उंचावला आहे.
या स्वागत समारंभप्रसंगी त्यांची आई बबीता सुनील पाटील, भाऊ धीरज पाटील, आजी अंजनाबाई विश्वास पाटील, काका राजेंद्र विश्वास पाटील, काकू दीपाली विलास पाटील, काकू लता राजेंद्र पाटील यांच्यासह पत्रकार पी. आर. माळी, जितेंद्र शिंपी, रफिक मणियार, महेश गायकवाड, डॉ. कैलास गुरव, डॉ. स्वप्नील बाहेती, दीपक पाटील, नंदलाल पाटील, दादू सुतार, अशोक पाटील, गोपाल सुतार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत पाटील यांनी जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर सुरक्षा दलात स्थान मिळवून गावातील युवकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या यशाचे अनुकरण करून युवकांनीही विविध क्षेत्रात प्रगती साधावी, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या. प्रशांत पाटील यांच्या यशामुळे अडावद गावात अभिमान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



