
यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोनगाव परिसरात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या मिनी ट्रकवर यावल पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी वाळूसह ट्रक असा एकूण २ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, यावल तालुक्यातील डोनगाव शिवारात अवैध वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, शनीवारी २८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी डोनगाव परिसरात सापळा रचला. यावेळी पांढऱ्या रंगाचा टाटा मीनी ट्रक (क्रमांक MH 06 AG 6497) संशयास्पद रितीने येताना दिसला. पोलिसांनी सदर ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्यात सुमारे ७ हजार रुपये किमतीची दीड ब्रास वाळू (गौण खनिज) आढळून आली. या वाळूच्या वाहतुकीबाबत चालकाकडे कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना किंवा शासनाची रॉयल्टी पावती नव्हती. शासनाची फसवणूक करून बेकायदेशीररित्या वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत पोलिसांनी २ लाख रुपये किमतीचा टाटा ट्रक आणि ७ हजार रुपयांची वाळू असा एकूण २ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोविंदा महारु पवार (वय २२, रा. कानळदा, जि. जळगाव) आणि गाडी मालक पुंडलिक भानुदास सपकाळे (रा. कानळदा, जि. जळगाव) या दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल मोहन तायडे हे करीत आहे.



