जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शाहू नगरात चिकन सेंटर दुकानासमोर तिन जण एकमेकांना शिवीगाळ करत सार्वजनिक शांतता भंग करून झोंबाझोंबी केल्याची घटना बुधवारी ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शाहु नगरातील ट्राफीक गार्डन जवळील चिकन दुकानासमोर बुधवार ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी अकील शरीफ शेख वय -३५ रा. शाहू नगर, योगेश समाधान तायडे वय ३१ आणि राजेश विजय शिंपी वय २९ रा. हरीविठ्ठल नगर हे तिघेजण एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्यावेळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी समाधान पाटील यांनी दोघांना सार्वजनिक ठिकाणी वाद घालू नका असे सांगितल्यानंतरही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलीसांनी तिघांवर कारवाई केली. पोलीस कॉन्स्टेबल समाधान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर शांतता भंग केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती देशमुख हे करीत आहे.