मुंबई प्रतिनिधी | आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली असून हे राजकीय षडयंत्र आहे. याआधी एसीबीने क्लीन चीट दिली असतांनाही आता सुरू असलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचा हल्लाबोल एकनाथराव खडसे यांनी केला. तर आपण ईडीला चौकशीत सहकार्य करणार असल्याचेही स्पष्ट केले.
याबाबत वृत्त असे की, माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांना काल सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. त्यांना पाच दिवसांची कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी खुद्द खडसे आणि त्यांच्या सौभाग्यवती मंदा खडसे यांच्यावरही कारवाईची शक्यता आहे.
या अनुषंगाने काल सायंकाळी एकनाथराव खडसे यांना उद्या अर्थात दिनांक ८ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याबाबतचे समन्स त्यांना जारी करण्यात आले आहे. यानंतर एकनाथराव खडसे यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याची तयारी दाखविली आहे. या अनुषंगाने ते आज सकाळी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
दरम्यान, चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलतांना एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भोसरी येथील हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा नसून तो खासगी मालकीचा आहे. या प्रकरणात आधी पाच वेळा चौकशी झालेली आहे. यात मला क्लीन चीट देण्यात आलेली आहे. आपण भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ईडीची चौकशी सुरू झाली आहे. यामुळे हे राजकीय षडयंत्र असल्याचे आपले मत आहे. जळगाव येथील भाजपच्या अनेक व्हाटसऍप ग्रुप्सपध्ये ‘कुछ तो होनेवाला है’ असे मॅसेज फिरत असून यामुळे हे राजकीय कारस्थान असल्याचा आरोप देखील एकनाथराव खडसे यांनी केला.
तथापि, आपण या सर्व प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. संबंधीत जागा ही एमआयडीसीने अधिग्रहीत केली नसल्याने हा व्यवहार पूर्णपणे वैध असल्याचा दावा एकनाथराव खडसे यांनी केला आहे. तथापि, आपण या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याची पुष्टी देखील खडसे यांनी दिली.