चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सायगाव येथून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर आणि जेसीबी जप्त करण्यात आले आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, तालुक्यातील अनेक भागांमधून अवैध वाळू वाहतूक केली जात आहे. या अनुषंगाने सायगाव येथील डोंगर भागात अवैध वाळूचा ढिगारा तयार करण्यात आला असून तेथून डंपर आणि जेसीबीच्या मदतीने याची वाहतूक करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. प्रांताधिकारी, तहसीलदार आणि अपर पोलीस अधिक्षकांनी याबाबतची खातरजमा करून ही माहिती पोलीस पथकाला दिली.
दरम्यान, या गुप्त माहितीवरून, सपोनि संदीप परदेशी यांच्यासह फौजदार मिलिंद शिंदे ,पोलीस कॉन्स्टेबल गोरख चकोर ,पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार ,पोलीस कॉन्स्टेबल जितु परदेशी, तसेच सोबत महसूल विभागातील बहाल मंडळ अधिकारी झाडे,तलाठी सचिन हातोळे राहुल अल्हात ,गणेश गढरी ,पवन शेलार घनश्याम बागुल ,कोतवाल सागर पाटील यांचे पथक कारवाईसाठी रवाना झाले.
गोपनीय माहिती आधारे सायगाव गावी जाऊन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी महसूल पथकासह डंपर जेसीबी असे अवैध रेती भरत असताना मिळून आले. त्यांच्याजवळ कोणताही परवाना नसल्याने सदर डंपर व जेसीबी असे मेहुनबारे पोलीस स्टेशन आवारात जमा करून ठेवण्यात आले आहे. या वाहनांवरती वरिष्ठ महसूल अधिकारी यांच्या आदेशान्वये दंडात्मक कारवाई कामी जमा करून रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे. तसेच या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.