Home क्राईम आरोपीच्या वडिलांनी दिल्या महिलांना जीवे मारण्याच्या धमक्या 

आरोपीच्या वडिलांनी दिल्या महिलांना जीवे मारण्याच्या धमक्या 

0
179

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  दहिगाव येथे घडलेल्या इमरान पटेल खून प्रकरणानंतर गावात आधीच तणावाचे वातावरण असताना, आता या प्रकरणातील एका संशयित आरोपीच्या वडिलांनी गावातील महिलांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर संतप्त महिलांनी थेट यावल पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या वडिलांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी दहिगाव (ता. यावल) येथे इमरान पटेल या युवकाची रात्रीच्या वेळेस निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मात्र, या तणावपूर्ण वातावरणातच एका आरोपीचा वडील रवींद्र पंढरीनाथ कोळी याने गावातील शेजारी राहणाऱ्या महिलांना “मुलाने खून केला म्हणून काय झालं? त्याला सोडवून आणतो, आणि तुम्हाला पण संपवतो,” अशा शब्दांत धमकावले.

या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांनी एकत्र येत यावल पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. पोलीसांनीही तातडीने दखल घेत आरोपी रवींद्र कोळीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. महिलांनी त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत, त्वरित कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, रवींद्र कोळी हा गावात अवैध दारू विक्रीचा धंदा करतो, अशीही माहिती समोर आली आहे. यामुळे महिलांनी पोलिसांसमोर प्रश्न उपस्थित केला की, अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीवर पोलिस कारवाई करतील का? की तो पुन्हा समाजात धोकादायक वातावरण निर्माण करेल?


Protected Content

Play sound