जळगाव प्रतिनिधी । कामावरून जेवणासाठी घरी जात असतांना मागून येणाऱ्या भरधाव क्रुझरच्या जोरदार धडकेत ५५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत क्रुझर चालकाच्या विरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंडित शंकर पाटील (वय ५५ रा. शिरसोली ह मु पिंप्राळा) हे सोमवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास कामावरून घरी जेवणासाठी सायकलने जात असतांना पिंप्राळा रिक्षा स्टॉपजवळ मागून येणाऱ्या क्रुझर क्रमांक (एमएच १८ एनए ४१७४) या भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत पंडित पाटील हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने खाजगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. परंतु प्रकृती अधिक खालावल्याने नातेवाईकांनी त्यांना गोदावरी रुग्णालयात दाखल केले. मात्र सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात क्रूजर चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. प्राथमिक तपास पो.हे.का. रवी नरवाडे करीत असून आज सकाळी 9 वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयताच्या पश्चात पत्नी प्रमिलाबाई व दोन मुले प्रवीण व शिवदास असा परिवार आहे.