जळगाव प्रतिनिधी । लग्न ठरल्यामुळे घरात सर्व आनंदाचे वातावरण…आज लग्नाची खरेदी अर्थात बस्ता असल्यामुळे बहुतांश नातेवाईक जमलेले. तेवढ्यात काळ आपला घाला घालतो आणि बाहेर गावाहून येत असलेल्या पाहुण्यांना घेण्यासाठी गेलेल्या नवरदेव मुलाचा रेल्वेखाली येत अपघाती मृत्यू होतो. नशिराबाद येथील अक्षय शामसुंदर मोरे (वय 23, रा. नशिराबाद ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
नशिराबाद येथील अक्षय शामसुंदर मोरे याचे नुकतेच लग्न ठरले होते. आज त्याचा बस्ता होता. बस्त्यासाठी आलेल्या पाहुण्यांना घेण्यासाठी अक्षय गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास असोदा रेल्वे स्टेशनला दुचाकीने गेला. दुचाकी पार्किंग करून असोदा रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी नशिराबाद रेल्वे फाटकाजवळ पायी जात असताना अचानक पाय रेल्वे रुळात अडकला. तेवढ्यात जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या नवजीवन एक्सप्रेसने त्याला चिरडले. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, ही घटना रेल्वेचे काम करणारा कर्मचारी सचिन साळी यांच्या लक्षात आल्याने नशिराबाद येथील तरुणांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद येथील नातेवाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळी त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान, ज्या घरातून वरात निघणार होती. त्याच घरातून अंत्ययात्रा निघाल्यामुळे गावात एकच हळहळ व्यक्त होत होती. मयत अक्षयच्या आई,बहिण आणि नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून सोडणारा होता. अक्षयच्या पश्चात आई, लहान भाऊ, विवाहित बहीण आणि मित्रपरिवार असा परिवार आहे. या घटनेप्रकरणी नशिराबाद पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.