सावदा तालुका रावेर प्रतिनिधी । सावदा ते पिंपरुड दरम्यानच्या महामार्गावर कार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की सावदा ते पिंपरूड यांच्या दरम्यानच्या महामार्गावर आज सायंकाळी सुमारे चार वाजेच्या सुमारास कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीस्वार हे सुमारे पाचशे मीटर पर्यंत घसरत गेले. यामुळे ते जबर जखमी झाले आहेत. या दोन्ही जणांची नावे गणेश अशोक कोळी (वय 35) आणि विक्की सीताराम सोनवणे (वय 27) असून ते रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथील रहिवाशी असल्याचे समजते.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन दोन्ही जखमी झालेल्यांना फैजपूर येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. या दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना लवकरच जळगाव येथे हलवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात पोलिस स्थानकामध्ये पंचनामा करून नोंद करण्याचे काम सुरू होते.