जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । 8 ऑगस्ट 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या स्मरणार्थ आज जळगावात ‘स्वदेशीचा स्वीकार – विदेशीचा बहिष्कार’ या देशव्यापी जनजागृती मोहिमेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मोहिमेचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे आणि स्वदेशी जागरण मंचचे देवगिरी प्रांत सहसंयोजक डॉ. युवराज परदेशी यांच्या हस्ते झाले. शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांनी नागरिकांना परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशी वस्तू खरेदी केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे आणि येत्या काही दिवसांत ती दुसऱ्या स्थानी पोहोचेल. यात प्रत्येकाला योगदान द्यावे लागेल.” अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के कर लावला आहे, याला प्रतिउत्तर आपण विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकून देऊ शकतो, असे सांगत त्यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा पुनरुच्चार केला.

स्वदेशी जागरण मंचचे देवगिरी प्रांत सहसंयोजक डॉ. युवराज परदेशी यांनी नागरिकांना अॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांकडून वस्तू खरेदी करण्याऐवजी स्थानिक व्यापारी आणि विक्रेत्यांकडून खरेदी करण्याचे आवाहन केले. “स्वदेशी जागरण मंच नेहमीच असा विश्वास ठेवतो की, कोणत्याही देशाचा विकास परकीय संसाधनांनी, आयातीने किंवा परदेशी तंत्रज्ञानाने होऊ शकत नाही,” असेही ते म्हणाले. जिल्हा सहसंयोजक गिरीश बर्वे यांनी आत्मनिर्भर भारतासाठी जळगाव जिल्ह्यातील व्यापारी व उद्योजक कसे योगदान देत आहेत, याची माहिती दिली. येत्या महिनाभरात ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी ‘बाजार जायेंगे स्वदेशी ही खरीदेंगे’, ‘स्वदेशी अपनाओ- देश बचाओ’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या प्रसंगी स्वदेशी जागरण मंचचे संपर्क प्रमुख अजिंक्य तोतला, शहर संयोजक चेतन वाणी, युवा प्रमुख कल्पेश सोनवणे, भाजपचे जिल्हाप्रमुख दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, अमोल वाघ, जयेश भावसार, सुनील सरोदे, नितीन इंगळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर:
स्वदेशी जागरण मंचतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. विदेशी वस्तूंना प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक उद्योगांना पाठबळ देण्याची मागणी यात करण्यात आली आहे. स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये व्यापारी संघटना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वरिष्ठ शाळा आणि विद्यार्थी यांच्या सहकार्याने जिल्हाभरात जनजागृती करण्यात येणार आहे.



