जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगातर्फे नगरपालिका आणि जिल्हाची स्थगित प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून, नगरपालिकांसाठी १० ते १४ मे दरम्यान प्रारुप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
राज्यातील मुदत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया दोन आठवडय़ांत सुरू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला होता. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील १५ नगपालिका, नगरपंचायती साठीची १० मार्चला थांबलेली प्रक्रिया पुढे सुरू करण्यात आली आहे. यात नगरपालिकांमध्ये १० ते १४ मे या कालावधीत प्रारुप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील १५ नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये १० ते १४ मे या काळात प्रारुप प्रभाग रचनेवर मागील दाखल झालेल्या तसेच नव्याने दाखल होणाऱ्या नागरिकांच्या दाखल हरकती आणि सूचनावर २३ मे पर्यंत जिल्हाधिकारी सुनावणी घेतील. तदनंतर नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना ही ७ जून रोजी जाहीर केली जाईल. जूनच्या पहिल्या आठवडय़ात प्रभाग रचना जाहीर झाल्यावर आरक्षणाची प्रक्रिया पार होऊन त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात १५ नगरपालिका नगरपंचायत
यात अ वर्ग नगरपालिका भुसावळ, ब वर्गातील अमळनेर, धालीस्गाव, चोपडा, पाचोरा तर क वर्गात भडगाव, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, फैजपूर, सावदा, रावेर, यावल आणि नशिराबाद अशा १५ नगरपालिका नगरपंचायतीचा समावेश आहे.