जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यात महसूल विभागातील दोन तलाठ्यांनी ३० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला असून सापळा कारवाईत दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर संदेश दिला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्रांतर्गत जळगाव घटकाने ही कारवाई केली. कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १८/२०२६ दाखल करण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात नरेश भास्कर शिरूड (वय ४१), तलाठी सजा उत्राण अहिर हद्द, ता. एरंडोल व शिवाजी एकनाथ घोलप (वय ४६), तलाठी सजा उत्राण गुजर हद्द, ता. एरंडोल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारदाराचा ट्रॅक्टर गिरणा नदीपात्रातून वाळू वाहतूक करताना २७ जानेवारी २०२६ रोजी पकडण्यात आला होता. पुढील कारवाई न करण्यासाठी व ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी आरोपी तलाठ्यांनी सुरुवातीला २५ हजार रुपयांची मागणी केली. नंतर पडताळणीदरम्यान ही मागणी ३० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. “इतरांकडून जास्त घेतो, तू गरीब आहेस म्हणून तुझ्याकडून ३० हजार घेतो,” असे सांगत आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पंचासमक्ष मागणी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा कारवाई राबविण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत आरोपी शिवाजी घोलप यांनी नरेश शिरूड यांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारताना एसीबी पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
सापळा कारवाईदरम्यान आरोपी नरेश शिरूड यांच्या ताब्यातून १ लाख ७३ हजार ३०० रुपये रोख रक्कम, सुमारे २९५० रुपये किमतीची Paul John कंपनीची ७५० मि.ली. व्हिस्की बाटली (गिफ्ट पॅकमध्ये) व ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी काम पाहिले. पथकात पो.नि. हेमंत नागरे, पो.अं. प्रदीप पोळ, पो.अं. अमोल सूर्यवंशी व पो.अं. सचिन चाटे यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत आहेत. वरिष्ठ मार्गदर्शन पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांचे लाभले.



