बिअर पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कल्याण-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कल्याण पूर्वेत एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे गुरुवारी अपहरण करून तिला एका ढाब्यावर बिअर पाजली. नंतर तिला एका निर्जन ठिकाणी असलेल्या इमारतीच्या भागात नेऊन तिच्यावर आशीष पांडे या इसमाने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी आशीष पांडे, त्याचा साथीदार अभिषेक डेरे यांच्यावर मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात यापूर्वी लैंगिक अत्याचार प्रकरणाचा आरोप असलेला आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या एका राजकीय पक्षाच्या माजी नगरसेवकाचा उल्लेख तक्रारदार कुटुंबीयांनी एक दृश्यध्वनी चित्रफितीत केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या माजी नगरसेवकाने मात्र आपल्याला बदनाम करण्यासाठी काही मंडळी हे कुटील डाव रचत आहेत, असा खुलासा माध्यमांकडे केला आहे.

आशीष पांडेला अटक करण्यात आली आहे. डेरे फरार आहे. पोलिसांनी सांगितले, पीडित अल्पवयीन मुलगी कल्याण पूर्वेत ज्या भागात राहते त्याच भागात आरोपी आशीष पांडे राहतो. तो पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. त्यामुळे पीडिता त्याला ओळखत होती. शाळेला सुट्टी असल्याने पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीकडे गुरुवारी दुपारी गप्पा मारण्यासाठी गेली होती. पीडीत मुलीला पाहून आशीषने तिला तुझ्या वडिलांनी तुला बोलावले आहे. असे सांगून पिडितेला तिच्या मैत्रिणीतून घराबाहेर बोलविले. आशीषने तिला स्वताच्या दुचाकीवर घेतले. त्यानंतर आशीषने आपला मित्र अभिषेक डेरे याला सोबत घेतले. तिघे नांदिवली भागातील एका ढाब्यावर गेले. तेथे आशीषने जबरदस्तीने पीडितेला बिअर पाजली. बिअर प्यायली नाहीतर तुझ्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी आशीषने पीडितेला दिली. पीडितेला जबरदस्तीने पिअर पाजण्यात आली. त्यामुळे पुढे काय झाले तिला समजले नाही. आशीषने नंतर तिला एका निर्जन स्थळी असलेल्या इमारतीत नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

दुपारी घराबाहेर गेलेली मुलगी संध्याकाळ झाली तरी घरी आली नाही म्हणून पालकांनी तिचा शोध सुरू केला. तिच्या मैत्रिणीला विचारणा करण्यात आली. त्यावेळी तिने ती आशीष पांडे यांच्या सोबत गेली असल्याचे समजले. त्यानंतर रात्रीच्या वेळेत पीडिता ती राहत असलेल्या घराच्या परिसरात गुंगीत असल्याचे कुटुंबीयांना दिसले. दुसऱ्या दिवशी तिला विश्वासात घेऊन पालकांनी तिला घडल्या प्रकाराविषयी विचारले. त्यावेळी आशीष पांडे यांनी आपले अपहरण करून आपणास जबरदस्तीने बिअर पाजली. आणि आपल्यावर लैंगिक अत्याचार केला आहे, असे तिने कुटुंबीयांना सांगितले. या प्रकाराने हादरलेल्या पालकांनी तातडीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन आशीष पांडे, अभिषेक डेरे यांच्या विरध्द गुन्हा दाखल केला. गुन्ह्यात नोंद नसले तरी पालकांनी दृश्यध्वनी चित्रफितीत कल्याण पूर्वेतील एका बड्या विकासक असलेल्या माजी नगरसेवकाचा उल्लेख या प्रकरणी केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले, न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार डेरे याचा शोध सुरू आहे.

Protected Content