यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील मोहराळा येथील एका विवाहितेने तिच्या प्रियकरासोबत आपल्या बाळाला घेऊन पळून गेल्यामुळे नैराश्यातून विवाहितेच्या पतीने आत्महत्या केली होती. याप्रकरणी २७ जुलै शनिवार रोजी यावल पोलिस ठाण्यात दोन जणांविरूध्द आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील मोहराळ या गावात तुषार गोपाळ पाटील या तरूणाची पत्नी वैष्णवी तुषार पाटील ही तिच्या एक वर्षीय बालक समर्थ याला सोबत घेऊन तिच्या प्रियकरासोबत १६ जुलै मंगळवार रोजी घरातून पळून गेली होती. तिच्या प्रियकराचे नाव प्रशांत सहदेव पाटील असे आहे. याप्रकरणी विवाहितेच्या पतीने यावल पोलिस ठाण्यात तिच्या आणि बाळाच्या हरवल्याची तक्रार नोंदवली होती. पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचे कळाल्यानंतर पतीने नैराश्यातून १९ जुलै शुक्रवार रोजी मोहराळा येथे राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.
यानंतर यावल पोलिस ठाण्यात २७ जुलै शनिवार रोजी मयत तरूणाचे वडील गोपाळ शामराव पाटील यांनी फिर्यादी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे मयताची पत्नी वैष्णवी पाटील आणि तिचा प्रियकर प्रशांत पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनील मोरे, हवालदार राजेंद्र पवार, हवालदार उमेश सानप करीत आहे.