Home Cities मुक्ताईनगर RTE 25% प्रवेशासाठी १ किमी अंतराची अट रद्द करा ; आ. एकनाथराव...

RTE 25% प्रवेशासाठी १ किमी अंतराची अट रद्द करा ; आ. एकनाथराव खडसेंचे शिक्षणमंत्र्यांना पत्र


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाने RTE २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी लागू केलेली निवासापासून १ किलोमीटर अंतराची अट विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याचा आरोप करत माजी मंत्री तथा आमदार Eknathrao Khadse यांनी शालेय शिक्षण मंत्री Dada Bhuse यांना पत्र पाठवले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवणारी ही जाचक अट तातडीने रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आमदार खडसेंनी राज्यस्तरावर ही मागणी करताना मुक्ताईनगर शहराचे उदाहरण दिले आहे. शहराच्या भौगोलिक विस्तारामुळे नामांकित शाळा मुख्य वस्तीपासून दूर अंतरावर आहेत. आदर्श शाळा, स्व. निखिल खडसे शाळा, जगदीश पाटील शाळा तसेच ई.के. टॅलेंट स्कूल या शाळा शहराच्या एका टोकाला असल्याने मध्यवर्ती भागात राहणाऱ्या पालकांना RTE पोर्टलवर या शाळांचे पर्याय निवडणे अशक्य होत आहे. शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर साधारणपणे ५ ते ६ किलोमीटर असल्याने १ किमीची अट व्यवहार्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

पत्रात त्यांनी स्पष्ट केले की Right of Children to Free and Compulsory Education Act 2009 या कायद्याचा मूळ उद्देश समाजातील वंचित घटकांना समान व दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र, ५ ते ६ किलोमीटर अंतरावरील शाळांसाठी १ किमीची सक्तीची अट लावणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असून यामुळे हजारो पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. खासगी शाळांचे वाढते शुल्क सर्वसामान्य आणि गरीब पालकांना परवडत नसल्याने शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

पूर्वीप्रमाणे ० ते १ किमी, १ ते ३ किमी आणि ३ ते ८ किमी अशी लवचिक अंतर मर्यादा लागू केल्यास विद्यार्थ्यांना अधिक पर्याय उपलब्ध होतील आणि RTE प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता व न्याय साधता येईल, असा दावा खडसे यांनी केला आहे. या संदर्भात सुधारित आदेश निर्गमित करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही विनंती त्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.


Protected Content

Play sound