मोहाडी – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कै. गोटू भाऊ सोनवणे माध्यमिक विद्यालय, मोहाडी येथे ४ सप्टेंबर २०२५ रोजी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी “अभ्यास – एक आनंद यात्रा” या मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले. महायोगी प्रेम जी प्रणित स्टुडंट प्रेमशक्ति योग या जागतिक अभियानांतर्गत झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव आणि ‘परमेश्वरी – हात उन्नती के…’ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या महायोगी प्रेम जींनी विद्यार्थ्यांना “पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर करून अभ्यास लक्षात कसा ठेवावा” यावर मोलाचे मार्गदर्शन केले. अभ्यास ही एक आनंददायी प्रक्रिया कशी होऊ शकते, आणि प्रत्येक विद्यार्थी ‘हुशार’ असून त्याला योग्य दिशेने मार्गदर्शन मिळाल्यास तो निश्चितच यशस्वी होऊ शकतो, हे त्यांनी सोप्या उदाहरणांसह स्पष्ट केले. इंग्रजी व गणित या विषयांतील सराव कसा करावा, त्यासाठी कोणती तंत्रे वापरावीत, यावरही त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ठोस मार्गदर्शन केले.

‘स्टुडंट प्रेमशक्ति योग’ हा अभ्यासासाठी तयार करण्यात आलेला अनोखा योग पद्धतीचा परिचय उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आला. ‘परमेश्वरी – हात उन्नती के…’ संस्थेच्या संचालक डॉ. विद्या चौधरी यांनी या योग पद्धतीविषयी माहिती देत सांगितले की, ही पद्धत विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती, एकाग्रता आणि अभ्यासातील गती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे.
या सुसंवादात्मक सेमिनारला विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महायोगी प्रेम जींनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी तत्परतेने उत्तरे देत आपली ग्रहणशक्ती आणि उत्सुकता सिद्ध केली. यामुळे उपस्थित शिक्षक आणि आयोजकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण होते.
कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शिरसाठ सर, क्षेत्र कार्य पर्यवेक्षक डॉ. भारती गायकवाड, डॉ. विद्या चौधरी, प्रमुख समन्वयक सौ. श्रुती चौधरी हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन रोशनी रोहिमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षेत्र कार्यातील विद्यार्थी रोहित वानखेडे, रोशनी रोहिमारे, रिंकू पिंगळे, शहाणी बारेला व ऋषिकेश मालवतकर यांनी मेहनत घेतली.
‘अभ्यास – एक आनंद यात्रा’ हे जागतिक अभियान गावपातळीवर पोहोचत असून, मोहाडीतील हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त व मानसिकदृष्ट्या उन्नतीदायक ठरला. हा सेमिनार विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा आणि अभ्यासाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा ठरला.



