खामगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय तंत्रनिकेतन, खामगाव येथे दिनांक ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान “अभिजात मराठी सप्ताह” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा गौरव वाढवण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अभिवाचन, निबंधलेखन, शब्दसंपदा, व रेखाटन स्पर्धांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरल्या सुप्रसिद्ध साहित्यिका व कवयित्री डॉ.अलका बोर्डे. त्यांनी मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेवर प्रकाश टाकताना विद्यार्थ्यांमध्ये भाषेप्रती नवीन प्रेरणा जागवली. त्यांच्या वऱ्हाडी हास्यकवितांनी वातावरणात आनंदाची लहर निर्माण केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे होते. आपल्या समारोपीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत म्हटले की, “मराठी ही आपल्या संस्कृतीची व आत्मसन्मानाची भाषा आहे.”
कार्यक्रमाचे आयोजन मराठी कक्षाने केले असून कादंबरी आचार्य, ओम करवंदे, गौरी वाळके, शिवानी नगरे व इतर विद्यार्थ्यांनी संयोजनात मोलाचा वाटा उचलला. प्रा. गजानन पदमणे यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. राजेश मंत्री यांनी आभार मानले.
सप्ताहभर चाललेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता, अभिमान आणि साहित्यिक संवेदनशीलता निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून आले.



