
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावसह राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री ना. गिरीश महाजन यांनी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत महायुतीची रणनीती स्पष्ट केली. “महापालिकेत उमेदवारी देताना घराणेशाहीचा विचार केला जाणार नाही, केवळ निवडून येण्याची क्षमता असलेल्या सक्षम उमेदवारांनाच तिकीट दिले जाईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

जागावाटपानंतरच ‘एबी’ फॉर्मचे वाटप :
जळगाव महापालिकेतील ७५ जागांबाबत बोलताना महाजन म्हणाले की, महायुतीमध्ये आधी जागावाटपाचा तोडगा निघेल. त्यानंतरच अधिकृत उमेदवारांची घोषणा केली जाईल आणि ‘एबी’ फॉर्म दिले जातील. जळगावात भाजपला ५५ ते ५७ जागा मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने काही कार्यकर्ते नाराज होणे स्वाभाविक आहे, मात्र त्यांची समजूत काढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांची टीका आणि मैत्रीपूर्ण लढत :
ठाण्यातील विकासकामांवरून अजित पवारांनी केलेल्या टीकेवर बोलताना महाजन म्हणाले की, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. जिथे महायुती एकत्रित लढत नाही, तिथे आरोप-प्रत्यारोप होणे स्वाभाविक आहे. “आम्ही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देऊ, पण एकमेकांवर टोकाची टीका करू नका, कारण निवडणुकीनंतर आपल्याला पुन्हा चार वर्षे एकत्र काम करायचे आहे,” असा मोलाचा सल्ला त्यांनी मित्रपक्षांना दिला.
ठाकरे बंधू आणि मुंबई महापालिका :
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर त्यांनी सडकून टीका केली. “ही स्वार्थी आणि मतलबाची युती आहे. २५ वर्षे सत्तेत असताना मराठी माणसाची आठवण आली नाही आणि आता मुंबई गुजरातला चालली, अशी ओरड सुरू आहे. मुंबईकर आता दूधखुळे राहिलेले नाहीत, ते महायुतीलाच कौल देतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अदानी-पवार भेटीवर प्रतिक्रिया :
गौतम अदानी आणि पवार कुटुंबाच्या भेटीवर महाजन यांनी सकारात्मक भूमिका घेतली. अदानी हे मोठे उद्योजक असून त्यांच्या गुंतवणुकीतून रोजगार निर्माण होतो. जर ते बारामतीत गुंतवणूक करत असतील आणि शरद पवार त्यांच्यासोबत असतील, तर त्यात गैर काहीच नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.



