Home Cities पाचोरा जळगाव जिल्हा काँग्रेस प्रभारीपदी आरीज बेग मिर्झा यांची नियुक्ती

जळगाव जिल्हा काँग्रेस प्रभारीपदी आरीज बेग मिर्झा यांची नियुक्ती

0
224


पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक हालचालींना गती देत, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जळगाव जिल्ह्यासाठी काँग्रेसचे नवीन प्रभारी जाहीर केले असून, अनुभवी नेते आरीज बेग मिर्झा यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या नियुक्तीचे जिल्हाभरात स्वागत होत असून, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

आर्णी (जि. यवतमाळ) येथील माजी नगराध्यक्ष आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत राहिलेले आरीज बेग मिर्झा सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत. संघटनात्मक कौशल्य आणि कार्यानुभवाच्या जोरावर त्यांची जळगाव जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच विधानसभा निहाय प्रभाऱ्यांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत.

जळगाव जिल्ह्यातील विविध विधानसभा क्षेत्रांसाठी काँग्रेस प्रभाऱ्यांची खालीलप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे – चोपडा विधानसभा क्षेत्रासाठी संजय उमरकर (बुलढाणा), अमळनेरसाठी किशोर कदम, रावेरसाठी डॉ. अरविंद कोलते (सरचिटणीस, म.प्र.का.क.), भुसावळसाठी रामविजय बुरुंगले (सरचिटणीस, म.प्र.का.क.), जळगाव शहरासाठी प्रकाश पवार (नाशिक), एरंडोलसाठी प्रकाश पाटील (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, बुलढाणा), चाळीसगावसाठी रणजितसिंग पवार (धुळे), मुक्ताईनगरसाठी तुळशीराम नाईक (बुलढाणा) आणि विशेषतः पाचोरा व जामनेर विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी आरीज बेग मिर्झा यांच्याकडे देण्यात आली आहे.

या नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला असून, लवकरच प्रभाऱ्यांच्या बैठकांचा आणि दौऱ्यांचा कार्यक्रम आखण्यात येणार असल्याची माहिती जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी या नियुक्त्यांचे स्वागत करत, पक्षसंघटनेला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound