मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | इंदिरा गांधी यांनी कोणतेही सबळ कारण नसतांना माझ्या वडलांना दोन वर्षे तर काकूंना अठरा महिने तुरूंगात डांबले होते. यामुळे आम्ही तुरूंगाला घाबरत नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी साबर पोलिसांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवून घेतला. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले. भाजप आमदार आशिष शेलार यांनी याबाबतचा एक स्थगन प्रस्ताव आज विधानसभेत मांडला. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर देताना फडणवीसांना या प्रकरणात गोवण्याचा कोणताही हेतू नसल्याचं स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नावली बदलण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. कालचे प्रश्न पाहिल्यावर याला काही राजकीय रंग असेल असं वाटतं. प्रश्न कुठे बदलले आणि कुणी बदलले हे मला माहीत आहे. मी कोणत्या घरातून येतो हे माहीत आहे का? इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात ठेवलं. त्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता. माझ्या काकूंना 18 महिने तुरुंगात ठेवले. त्यांनीही कोणताही गुन्हा केला नव्हता. आम्ही जेलला घाबरणारे नाही. ज्यांनी प्रश्नावली बदलली त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे अशा प्रकारच्या मुद्द्यावर आम्ही लढतच राहणार. जी काही कायदेशीर लढाई असेल ती लढू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मला प्रिव्हलेज घ्यायचं नव्हतं हेही मी स्पष्ट केलं होतं. मला जी प्रश्नावली पाठवण्यात आली होती त्यातील प्रश्न साक्षीदाराचे होते. कालचे प्रश्न आरोपीसाठीचे होते. तुम्ही ऑफिशियल सिक्रेसीचा भंग केला का? असा प्रश्न मला विचारण्यात आला. असं साक्षीदाराला विचारतात का? जाणीवपूर्वक प्रश्नावली बदलून या व्यक्तीला गुंतवता येतं का हेही यातून दिसत होतं. मी वकील आहे. मलाही समजतं. एक नागरिक म्हणून व्हिसल ब्लोअर अॅक्टप्रमाणे मी प्रोटेक्टेड आहे. जे कागदपत्रं माझ्याकडे होते. ते मी कुणाला दिले नाही. केंद्रीय गृहसचिवांना मी ते दस्ताऐवज दिले. पण तुमच्या मंत्र्यानेच ते मीडियाला दिले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.