नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीत उद्या दिल्लीतील सातही जागांवर मतदान होणार आहे. त्याआधीच आम आदमी पार्टीचे नेते केजरीवाल यांनी माझ्या वडिलांना सहा कोटी रुपयांना निवडणुकीचे तिकीट विकल्याचा आरोप ‘आप’च्या एका उमेदवाराच्या मुलानेच केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
आपचे पश्चिम दिल्लीतील उमेदवार बलबीर जाखड यांचे चिरंजीव उदय जाखड यांनी हा आरोप केला आहे. मात्र बलबीर जाखड यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. दरम्यान, केजरीवाल यांना सहा कोटी रुपये दिल्यानंतर उमेदवारी मिळाल्याचे माझ्या वडिलांनीच मला सांगितले होते. मी त्यांना पैसे देऊन तिकीट घेण्यास विरोध केला होता, असेही उदय यांनी सांगितले. उदय यांच्या म्हणण्यानुसार त्यांना उच्च शिक्षणासाठी पैसे हवे होते. मात्र त्यांच्या वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला होता. त्यांनी उदय यांना पैसे देण्याऐवजी केजरीवाल यांना पैसे दिले होते.
माझे वडील सुरुवातीपासून आम आदमी पक्षात असल्याचा किंवा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचा एक तरी पुरावा दाखवा, असं आव्हानच उदय यांनी केजरीवाल यांना दिले आहे. माझ्या वडिलांनी केवळ तीन महिन्यांपूर्वीच राजकारणात भाग घेतला आहे. त्यापूर्वी ते कोणत्याच पक्ष किंवा संघटनेशी संबंधित नव्हते. वडिलांनीच मला केजरीवाल आणि गोपाळ राय यांना सहा कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले होते, असे स्पष्ट करतानाच याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.