भुसावळ प्रतिनिधी । लोकसंघर्ष मोर्चातर्फे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाची जय्यत तयारी असल्याची माहिती आज देण्यात आली.
लोकसंघर्ष मोर्चातर्फे बेरोजगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी भुसावळ ते जळगाव लॉग मार्च करत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने भरत परदेशी यांनी लाईव्ह ट्रेंड न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत याच्या आयोजनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, उद्या या मोर्चाला भुसावळ येथील डी. एस. मैदानावरून दुपारी १२ वाजता सुरुवात होईल. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आक्रोश मोर्चा धडकणार आहे. भुसावळ येथून निघाल्यानंतर बुधवारी संध्याकाळी आक्रोश मोर्चा नशिराबाद येथे पोहचून मुक्काम करेल. ऑल इंडिया रेल्वे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये भरती करा, २० टक्के कोटा त्वरित रद्द करावा, महानिर्मिती, महावितरण, महापारेषण, ऑर्डनन्स फॅक्टरी, महाराष्ट्र एस.टी. महामंडळ येथील अप्रेंटिस विद्यार्थ्यांना कायमची नोकरी द्या, सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा पाच हजार बेरोजगारी भत्ता सुरु करा, सर्व रिक्त शासकीय जागा भरून त्यात कंत्राटी व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य मिळावे आदी विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे.
पहा : लोकसंघर्ष मोर्च्याच्या आयोजनाची माहिती देणारा हा व्हिडीओ.