बुलढाणा प्रतिनिधी । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळत आहेत. अश्या बिकट परिस्थितीत आ. श्वेताताई महाले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आधार कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून परिसरातील रुग्णांना मोठा आधार मिळेल असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. रविवार, दि. १६ मे रोजी सेंटरचे रुग्णार्पण फडणवीस यांच्या हस्ते झाले, या प्रसंगी ते बोलत होते.
स्व. दयासागर महाले स्मृती प्रित्यर्थ लोकवर्गणी व शासकीय सहभागातून आ. श्वेताताई महाले यांच्या पुढाकाराने आधार कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. आज या उपक्रमाचे रुग्णार्पण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार चैनसुख संचेती, प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे, जिल्हाध्यक्ष आ. आकाश फुंडकर आदी मान्यवर या प्रसंगी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी केले तर श्याम वाकदकर यांनी आभार मानले