चोपडा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मित्रांसोबत दारूच्या पार्ट्या करतो व मित्रांना दारू पाजतो असे बोलण्याच्या संशय घेऊन ३ जणांनी एका तरुणाला बैलगाडीचा लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २८ डिसेंबर रेाजी सकाळी ९ वाजता चोपडा तालुक्यातील विरवाडे गावात घडली आहे. या संदर्भात चोपडा शहर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दादा बारकू ठाकूर वय-३१, रा.विरवाडे ता. चोपडा असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील विरवाडे गावात दादा ठाकूर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान दादा ठाकूर याने गावात राहणारा दिनेश मधुकर कोळी हा मित्रांना दारू पाजतो आणि मित्रांसोबत दारूच्या पार्ट्या करतो असे बोलल्याचा संशय घेतला. या संशयावरून दिनेश कोडी याच्यासह पिंटू उर्फ अरुण गोविंदा कोळी आणि शरद संतोष कोळी तिघे रा.विरवाडे ता. चोपडा यांनी शुक्रवारी २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता बैलगाडीवरील असलेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दादा ठाकूर हा गंभीर जखमी झाला. त्याला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा शनिवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उपचारात मृत्यू झाला. मयत दादा ठाकूर यांची आई रजूबाई ठाकूर यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे दिनेश मधुकर कोळी, पिंटू उर्फ अरुण गोविंदा कोळी आणि शरद संतोष कोळी तिघे रा. विरवाडे ता.चोपडा यांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे करीत आहे.