तरूणीचं टोकाचं पाऊल; त्रासाला कंटाळून घेतली विहिरीत उडी !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील गांधली शिवारात विहिरीत बुडून १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. प्रेमसंबंधातून आलेल्या मानसिक त्रासामुळेच तरुणीनं आपली जीवनयात्रा संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत तरुणीचे नाव जयश्री संजय संदानशिव (वय १८, रा. गांधली, ता. अमळनेर) असे आहे. जयश्रीचे वडील संजय विनायक संदानशिव (वय ४२) यांनी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांच्या मुलीचे गावातील विजय उर्फ राज विलास बागुल (भिल) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात काही कारणांमुळे जयश्रीला मानसिक त्रास देण्यात आला, त्यामुळे ती नैराश्यात गेली. या त्रासातूनच जयश्रीने १० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता गाव सोडले. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास धनंजय कुलकर्णी यांच्या गांधली शिवारातील शेतातील विहिरीच्या पाण्यात उडी मारून तिने आत्महत्या केली.

यापूर्वी पाच-सहा महिन्यांपूर्वी देखील जयश्रीने प्रेमसंबंधातील अडचणींमुळे घरात जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती वडिलांना तिच्या चुलत भावाकडून (संदीप संदानशिव) मिळाली. जयश्रीच्या आत्महत्येसाठी विजय उर्फ राज बागुल यानेच प्रवृत्त केले, अशी खात्री पटल्याने वडिलांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विजय उर्फ राज बागुल (भिल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पो.उपनि. नामदेव बोरकर हे करत आहे.