भावासोबत दुचाकीने परिक्षेला जाताना ट्रकखाली आल्याने तरूणी ठार

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भावासोबत दुचाकीने परीक्षा केंद्रावर जात असलेल्या तरुणीचा ट्रकखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचा भाऊ गंभीर आहे. ही दुर्दैवी घटना मनीषनगर-बेसा मार्गावर शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. यात ट्रक चालकाची कोणतीही चूक नसल्याचे प्रत्यक्षीदर्शींचे म्हणणे आहे. प्रियंका योगेश मानकर रा. पांजरा, कोराडी असे मृत तरुणीचे नाव आहे. जखमी भाऊ योगेश आवारे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रियंका बँकिंग परीक्षेची तयारी करीत होती. शनिवारी तिची परीक्षा होती. बेसा परिसरातील एम.के.संचेती शाळेत तिचे परीक्षा केंद्र होते. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास प्रियंका आणि योगेश एमएच-४०/सीआर-३४०३ क्रमांकाच्या दुचाकीने परीक्षा केंद्रावर जात होते. मनीषनगरातून बेसाकडे जाताना टिल्ट बिअर बारसमोर योगेशने पुढे जात असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान समोरून एक मालवाहू आले. निघण्याचा कोणताही मार्ग नसल्याने योगेशने जोरात ब्रेक दाबला. त्याचे वाहन घसरले आणि दोघेही डावीकडे पडले. ट्रकच्या मागच्या चाकात डोके आल्याने प्रियंकाचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक लोक मदतीसाठी धावले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.

 

 

Protected Content