मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रेमसंबंधातून तरूणीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी अंधेरी पूर्व येथे घडली. पोलिसांनी तातडीने याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकर झैब ख्वाजा हुसैन सोलकर याला अटक केली आहे. आरोपीने खून करण्यासाठी वापरलेली ओढणी पोलिसांनी जप्त केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
इर्शाद सय्यद यांच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सय्यद हे टेम्पो चालक असून अंधेरू पूर्व येथील मरोळ परिसरात अशोक टॉवर येथे राहतात. सय्यद यांची पुतणी सारा सय्यद हिची अंधेरी पूर्व येथील चिमण पाडा येथील भावाच्या घरी गळा आवळून खून करण्यात आला होता. तिला तातडीने कुपर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सहार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी तातडीने तपास केला असता सारा व तिचा प्रियकर झैब सोलकर यांच्यात वाद झाला असून त्यातून आरोपीने हाताने व ओढणीने गळा आवळून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलिसांनी इर्शाद सय्यद यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. त्यावेळी झैब हा जोगेश्वरी पूर्व येथे राहत असल्याचे पोलिसांना समजले. तातडीने पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी झैबला अटक केली. दोघांमध्ये नियमीत वाद होत होते. त्यातून आरोपीने तरुणीला मारल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्ह्यांत वापरण्यात आलेली ओढणी जप्त केली आहे.