Home प्रशासन सतर्क पत्रकाराच्या तत्परतेने वाचला तरुणाचा जीव 

सतर्क पत्रकाराच्या तत्परतेने वाचला तरुणाचा जीव 


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात एका स्थानिक पत्रकाराच्या सतर्कतेमुळे परप्रांतीय युवकाचा जीव वाचल्याची हृदयस्पर्शी घटना घडली असून, या प्रसंगामुळे वेळेवर केलेल्या मदतीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल येथील विश्वजीत मोंटू उराव (वय 18) हा युवक रोजगाराच्या शोधात मुक्ताईनगर येथे आला होता. शनिवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर तो एकटा आणि अस्वस्थ अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याची ही अवस्था स्थानिक ‘मंडे टू मंडे न्यूज’चे पत्रकार अक्षय काठोके आणि त्यांचे मित्र सुमित काचकूटे यांच्या निदर्शनास आली.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी तत्काळ युवकाजवळ जाऊन त्याच्याशी संवाद साधला. यावेळी घरगुती तणावामुळे तो टोकाचा निर्णय घेण्याच्या मानसिक अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. परिस्थितीची नाजूकता ओळखून कोणताही विलंब न करता त्यांनी त्या युवकाला आपल्या वाहनातून थेट मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नेले.

पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर अंमलदार अजय खंडेराव आणि कर्मचारी दीपक ढाकरे यांनी युवकाची समजूत काढत त्याला मानसिक आधार दिला. तसेच त्याच्या ओळखीच्या व्यक्तींशी संपर्क साधून परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढे त्या युवकाला त्याच्या मित्र आणि नातेवाईकांच्या ताब्यात सुरक्षितरित्या देण्यात आले.

या संपूर्ण घटनेत पत्रकार अक्षय काठोके आणि त्यांच्या मित्रांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि मानवतावादी दृष्टीकोन यामुळे एक मोठा अनर्थ टळला. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, समाजात सकारात्मक संदेशही पोहोचला आहे की, योग्य वेळी केलेली मदत एखाद्याला नवजीवन देऊ शकते.


Protected Content

Play sound