अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण ठार

पहूर,ता . जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अज्ञात वाहनाने दुचाकीस दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात शेंदुर्णी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पहूर – शेंदुर्णी मार्गावर असलेल्या घोडेस्वार बाबा दरगाह जवळ सायंकाळी सव्वा सहा च्या सुमारास घडली .

याबाबत अधिक माहिती अशी की, शेंदुर्णी येथील दिपेश योगेश शिंपी (वय २३ ) व त्याचा मित्र अक्षय जितेंद्र जाधव (वय २१) हे दोघेजण दुचाकीने (क्र . एम . एच . १९ डी यू ६२५७) पहूरकडे येत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली . या अपघातात दीपेश योगेश शिंपी याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर अक्षय जाधव यास गंभीर दुखापत झाली .आजूबाजूच्या लोकांनी नातेवाईकांना संपर्क केला असता दीपेश योगेश शिंपी यांस पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ . मयुरी पवार यांनी तपासणीअंती मृत घोषित केले . दरम्यान गंभीर जखमी असलेल्या अक्षय जितेंद्र जाधव यास पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली विलास चव्हाण करीत आहेत. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या दीपेशच्या अकाली जाण्याने शेंदुर्णी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

Protected Content