पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या झटका मशीन तारांचा स्पर्श झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील भोजे येथे सोमवारी ९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी शेतमालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल संतोष पाटील (उभाळे) रा. भोजे, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे मयताचे नाव आहे. पाचोरा तालुक्यातील भोजे शिवारात असलेल्या श्रीकृष्ण धनराज उभाळे याच्या शेतात ही घटना घडली. श्रीकृष्ण उभाळे यांनी आपल्या शेतात पिकांच्या संरक्षणासाठी ‘झटका मशीन’ लावून त्याद्वारे तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडला होता. अमोल पाटील हा परिसरातून जात असतांना त्याचा स्पर्श झटका मशीनच्या तारांना लागला. या तारांमधील विद्यूत प्रवाहामुळे अमोलला जोरदार झटका लागला आणि त्याचा दुदैवी अंत झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मयताचे वडील संतोष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेतमालक श्रीकृष्ण धनराज उभाळे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करीत आहे.




