भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गच्चीवरील पाणी सांडल्याच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करून धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता मुस्लिम कॉलनी परिसरात घडला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नीतू दिलावरसिंग राजन वय-२८ रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता शेजारी राहणारे नाझिया जावेद मेमन याने गच्चीवरील पाणी सांडल्याच्या कारणावरून नीतू दिलावरसिंग राजन आणि त्याच्या घरातील सदस्यांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि धमकीही दिली.
हा प्रकार घडल्यानंतर मुस्लिम कॉलनी परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार नाझिया जावेद मेमन याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र भावसार हे करीत आहे.