Home क्राईम बांधकाम वादातून लोखंडी आसारीने हल्ला करत तरुणाला केले रक्तबंबाळ

बांधकाम वादातून लोखंडी आसारीने हल्ला करत तरुणाला केले रक्तबंबाळ


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बांधकामाच्या किरकोळ वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मयूर कॉलनीत समोर आली आहे. “घराचे काम पूर्ण करून दे, नाहीतर दिलेले पैसे परत कर,” असे विचारल्याच्या कारणावरून तिघा संशयितांनी एका तरुणाला लोखंडी आसारीने बेदम मारहाण केली. ही घटना १५ जानेवारी रोजी दुपारी पिंप्राळ्यातील मयूर कॉलनी परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी नगरातील रहिवासी तुषार दत्तात्रय सोनवणे यांनी संशयित आरोपी मुस्तफा शेख, मुस्तकीम शेख आणि शाहीद शेख यांना बांधकामाचे कंत्राट दिले होते. मात्र, काम वेळेत पूर्ण होत नसल्याने तुषार यांनी त्यांना जाब विचारला. १५ जानेवारी रोजी दुपारी तुषार आणि विशाल सोनवणे हे मयूर कॉलनीत गेले असता, त्यांनी आरोपींकडे कामाची किंवा पैशांची मागणी केली.

तुषार यांनी पैशांची मागणी केल्याचा राग आल्याने तिन्ही संशयितांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयितांनी जवळच असलेल्या लोखंडी आसारीने (बांधकामासाठी वापरले जाणारे अवजार) तुषार यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले.

या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी तुषार सोनवणे यांनी १६ जानेवारी रोजी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी मुस्तफा शेख, मुस्तकीम शेख आणि शाहीद शेख या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान मलिक करत आहेत.


Protected Content

Play sound