चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील हॉटेल सुयोग परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर धारदार चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुरूवारी १९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता चोपडा शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा शहरातील बारीवाडा परिसरात राहुल गोपाळ गवळी (वय ३८) हा तरूण गावातील हॉटेल सुयोगच्या काउंटरजवळ हे १८ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उभा होता. यावेळी संशयित आरोपी ‘भावड्या’ चौधरी (रा. मल्हारपुरा, चोपडा) हा राहूलजवळ आला. “तुझा भाऊ वैभव टाकल्या याचा मला मर्डर करायचा आहे,” असे म्हणत त्याने राहुल यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने रागाच्या भरात आपल्याजवळील धारदार चाकू काढून राहुल यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राहुलच्या दोन्ही हातांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. भरवस्तीत आणि हॉटेलच्या आवारात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी हे करीत आहे.



