
चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रिेतनिधी । चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील पाण्याच्या खदानीत तोल जाऊन पडल्याने एका ३३ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मनोज भगवान पाटील (वय ३३, रा. रागणपूर, ता. चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रागणपूर गावात राहणारा मनोज पाटील हा तरुण आज, बुधवार, १४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास चहार्डी येथील एका पाण्याच्या खदानीजवळ होता. अज्ञात कारणाने त्याचा अचानक तोल गेला आणि तो थेट खदानीतील खोल पाण्यात पडला. पाण्यात पडल्यानंतर त्याला पोहता न आल्याने किंवा इतर काही कारणांमुळे तो पाण्यात बुडाला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला.
ही घटना घडल्यानंतर परिसरातील काही तरुणांनी तात्काळ धाव घेतली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर मनोजला तातडीने चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
मनोज पाटील यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने रागणपूर गावात शोककळा पसरली आहे. चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप भोई हे करत आहेत.



