जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील ३२ वर्षीय तरूणाने सासू-सासरे यांच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी तरूणाने सुसाईड नोटस् लिहून ठेवली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमोल प्रकाश धनगर (वय ३२ रा. अशोकनगर, शिरसोली प्र.न.) असे मयत तरुणाचे नाव आहे. अमोलचा व्यवसाय हा बकरी चारण्याचा आहे. त्यातून कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होता. शिरसोली जळके रोडवरील भोलेनाथ नगरमधील बकऱ्यांच्या शेडमध्ये दररोज रात्री अमोल झोपायला जायाचा.
शनिवारी २७ नोव्हेंबर रोजी रात्री त्याने वडिल प्रकाश धनगर यांना झोपण्यासाठी पाठवले होते. अमोल धनगर हा घरी झोपला होता. रविवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता वडील प्रकाश धनगर घरी आले. त्यवेळी अमोलने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. यावेळी त्यांनी आरडाओरडा केला. गल्लीतील लोक धावले. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
अमोल याच्या खिशात सुसाईड नोट आढळली आहे. यात त्याने सासु सासरे यांच्या धमक्या व छळाला कंटाळून मी जीवन यात्रा संपवत आहे, असे नमुद केले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यांच्या पश्चात १मुलगा २ वर्षाचा वेदांत, १ मुलगी ४ वर्षाचा तेजश्री, पत्नी, वडील, भाऊ आहे. अमोलची पत्नी एक ते दीड महिन्यापासून मुलांना घेऊन माहेरी गेली आहे.