
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीचा मुक्ताईनगरजवळील पिंप्री नांदू शिवारात तापी नदीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विनोद विजय भिसे (वय ३८, रा. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद भिसे हे कोणत्या कारणास्तव तापी नदीच्या पाण्यात उतरले होते किंवा त्यांचा बुडण्याचा नेमका प्रकार काय आहे, याची निश्चित माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, पिंप्री नांदू शिवारातील नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. सोमवारी सकाळी ११ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह तात्काळ मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला.
विनोद भिसे यांच्या अकाली निधनामुळे जळगावातील त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नदीपात्रात बुडून झालेल्या या दुर्दैवी घटनेची नोंद मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजकुमार चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.



